हडको भागातील संत सेना भवन येथे संत सेनाजी महाराज यांची जयंती भक्तीभावाने साजरी

सोयगाव तालुका..
प्रतिनिधी संतोष गर्दे..

छत्रपती संभाजीनगर येथील एन-१२, हडको भागातील संत सेना भवन येथे शुक्रवारी संत सेनाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी केवळ पूजन व उत्सव न साजरे करता समाजाच्या उन्नतीसाठी एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी संकल्प करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात श्री संत सेना शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष कचरू जाधव यांच्या हस्ते सेनाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. पूजनानंतर पर्यावरणपूरक संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.
विष्णु वखरे व पद्माकर आंबोदकर यांनी संत सेनाजी महाराजांचा इतिहास, त्यांची शिकवण आणि समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान याविषयी मार्गदर्शन केले. सेनाजी महाराजांनी कर्मप्रधानता, समतेचा विचार आणि श्रमप्रतिष्ठा या मूल्यांचा पुरस्कार केल्याचे विष्णू वखरे यांनी सांगितले. तसेच मंदिर उभारणीच्या कामाचा आढावा घेत पुढील टप्प्यातील नियोजन, निधी संकलन, कामाचा वेग आणि सहभाग या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रीय सहभाग हे या कार्याचे यशस्वी तत्व ठरणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमात मनोज जाधव, संजय पंडित, सर्जेराव शिंदे, सचिन गायकवाड, सुशील बोर्डे, विजय थोरात, प्रभाकर लिंगायत, विजय मोरे, मनोहरराव बिडवे, गायकवाड सर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवून सेनाजी महाराजांना अभिवादन केले.