भैरवनाथ यात्रेत बारा गाड्या ओढीत भक्तांनी फेडले नवस,भैरवनाथांचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन, यात्रात्सव शांततेत—
प्रतिनिधी संतोष गर्दे
दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.12 – नवस फेडण्यासाठी बारा गाड्या ओढण्याचा परंपरा असलेला शहराचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बहिरोबा ( भैरवनाथ ) महाराजांची यात्रोत्सव शनिवारी उत्साहात पार पडली.पारंपारिक वगदा वगदी मिरवणूक व बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी भैरवनाथांचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेनिमित्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सोयगाव -पळसखेडा रस्त्यावर संपुर्ण लोण्याचा बहिरोबा (भैरवनाथ) चे प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे.वर्षभर येथे भाविक दर्शनासाठी येतात परंतु चैत्र पौर्णिमेच्या दिवशी येथे यात्रा भरते. दि.12 शनिवारी रोजी सकाळी पारंपारिक पद्धतीने जागृत हनुमान मंदिर जुना बाजार चौक येथून वगदा वगदी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी बारा वाजता भैरवनाथांची आरती झाल्यानंतर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला.भाविकांनी मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी भैरवनाथांच्या दरबारी कबूल केलेले नवस चैत्रपौर्णिमेच्या दिवशी बारा गाड्या ओढून व भैरवनाथ महाराजांना डाळ बट्टी चा नैवद्य दाखवीत नवस फेडण्याची या यात्रोत्सव मधील परंपरा असल्याने बारा गाड्या ओढण्याची परंपरा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिडशे च्या जवळपास भक्तांनी मानलेले नवस फेडले. खान्देश, मराठवाडा व विदर्भातील हजारो भाविक भक्तांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतला. संस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सस्थानचे अध्यक्ष दिलीप बिर्ला,रवींद्र काळे,राजेंद्र जावळे,राजू दुतोंडे,दत्तू अस्वार,ईश्वर गव्हांडे,दत्तू एलिस,अतुल परदेशी,कृष्णा पाटील यांनी दर्शनासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे संस्थानाच्या वतीने श्रीफळ देऊन सत्कार केला.भैरवनाथ संस्थान कमिटीचे सदस्य व स्वयंसेवकानी योग्यरित्या नियोजन केल्याने भाविकांनी रांगेत दर्शन घेतले. सोयगाव पोलीस ठाण्याच्या वतीने भैरवनाथ मंदिर परिसर व यात्रेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उष्णतेची दाहकता लक्षात घेता भैरवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी समर्पण फाउंडेशन तर्फे जलसेवा व प्रथमोपचार व्यवस्था करण्यात आली होती. प्रथमोपचार मध्ये ओआरएस पावडर, मलम पट्टी, औषधी, सॅनिटायजर आदी. आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. इतर ठिकाणी ही सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत जलसेवा उपलब्ध करण्यात आली होती.