काँग्रेस कमिटी सोयगाव यांच्या वतीने बबनराव लोणीकर यांच्या बेताल वक्तव्याबद्दल निषेध व्यक्त करत तहसील कार्यालयात निवेदन..

अच्छे दिन कुठे गेले? शेतकऱ्यांवर वर्मी बसणारे भाजप आमदार – काँग्रेस आक्रमक

सोयगाव (प्रतिनिधी): संतोष गर्दे..

सोयगाव तहसील येथे काँग्रेस कमिटी तर्फे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या निषेध व्यक्त करत निवेदन
“शेतकऱ्याच्या पायात चप्पल आमची, हातात मोबाईल आमचा, आई-बहीण बायकोच्या पगाराचं श्रेय आमचं शेतकरी सन्मान निधी दिला जातो तो आमचा… काय हा त्याच्या बापाच्या घरून देतो?” — असं आक्षेपार्ह वक्तव्य भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी नुकतंच केलं आणि त्यामुळे संपूर्ण शेतकरी बांधवांची संतापाची लाट उसळली आहे.
या बेताल वक्तव्याचा सोयगाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दि. 27 जुन रोजी तहसील कार्यालयात जाहीर निषेध करण्यात आला. मा.दंडाधिकारी मनीषा मेने यांच्याकडे दिलेल्या निवेदनात काँग्रेसने बबनराव लोणीकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असून, यापुढे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या कोणत्याही भाजप आमदार-खासदारांची आमदारकी व खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
२०१४ पासून सत्ता असलेल्या भाजप सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली. अतिवृष्टी, गारपीट, बोगस बियाणे, महागडं डिझेल, खत, औषधं यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय. २०१२ मध्ये सोयाबीनला मिळणारा ₹३२०० चा भाव आज २०२५ मध्येही ₹३८००-४००० वर अडकलेला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक कोण करतंय?
रावसाहेब दानवे यांच्यासारखं “साले रडतात” म्हणणं असो की बबनराव लोणीकर यांचं “मोबाईल आमचा, पगार आमचा” तुमच्या अंगावरील कपडे आमचे पायातली चप्पल आमची म्हणणं असो — हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे. काँग्रेसने हा अत्यंत गंभीरपणे घेतलं असून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची ग्वाही निवेदनात देण्यात आली आहे.
या निषेधात सोयगाव शहराध्यक्ष दिनेश हजारी, दिलीप देशमुख, सुनील माकोडे, रहीम पठाण, सुनील चोरमले, दीपक गव्हाणे, सुनील चव्हाण, अजय चव्हाण, सागर जयस्वाल, प्रमोद कोते यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट,
“भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य हे फक्त असंवेदनशील नाही, तर थेट शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानावर घाव घालणारे आहे. ज्यांच्या राबलेल्या हातांमुळे हा देश चालतो, त्याच शेतकऱ्यांना हे सरकार आज उपहासाने वागवत आहे. आम्ही असा अपमान खपवून घेणार नाही. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल, गरज पडली तर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल. बबनराव लोणीकर यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.”

-दिलीप देशमुख उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी सोयगाव-

चौकट,
“शेतकऱ्यांबद्दल जे घृणास्पद वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केलं आहे, ते फक्त राजकीय असंवेदनशीलता नाही, तर मानसिक दिवाळखोरीचं उदाहरण आहे. जेवढं अन्न त्यांच्या घरात जातं, तेवढं आमच्या शेतकऱ्याच्या घामाने निर्माण होतं. मग त्यांनाच असं बोलून अपमान करणं हे अत्यंत लाजिरवाणं आहे. काँग्रेस पक्ष अशा वक्तव्यांचा तीव्र निषेध करतो आणि सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी आमची ठाम मागणी आहे. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू.”

-दिनेश हजारे सोयगाव शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी-