चोरटी वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक पकडला
महसूल पथकाची उल्लखनीय कामगीरी

प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव दि.26- महसूल चे गौण खनिज नियंत्रण पथक कारवाई करीत नसल्याने सोयगाव सह तालुक्यात गौण खनिज चोरटी वाहतूक फोफावल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्याने महसुलच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात होता. मार्च अखेर का होईना गौण खनिज नियंत्रण पथकास सूर गवसला व मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सापळा रचून चोरटी वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक पकडून महसूल ने कारवाई केली असतांना देखील बुधवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान महसुलच्या नाकावर टिच्चून चोरटी वाळू वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक शहरात खाली करण्यात आल्याने महसूल व वाळू माफियांमध्ये जुंपली आहे. महसूल विभाग या एकाच कारवाईवर फुल स्टॉप करतात की पुन्हा कारवाई करण्यासाठी अग्रेसर राहतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, विना परवाना चोरटी वाळू वाहतूक करणारा टाटा हायवा ट्रक (क्रमांक एम एच 20 ई सी 1773) सोयगाव – शेंदुर्णी बायपास रस्त्याने सोयगाव शहरात येत असल्याच्या गुप्त माहितीवरून सोयगाव महसूल विभागाच्या पथकाने संत गाडगे महाराज चौकात दि.25 मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सापळा रचून पकडल्याने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले असून तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी महसूल विभागाने केलेले कारवाईचा पंचनामा करण्यात येऊन हायवा मालकास 3 लक्ष 71 हजार रुपयांचा दंडाची नोटीस काढण्यात आल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिली.
सोयगाव तालुक्यात जळगाव जिल्ह्यातील शेंदूरणी कडून सोयगाव कडे अवैध वाळू विना परवाना वाहतूक करणारा हायवा ट्रक (क्रमांक एम एच 20 ई सी 1773) हा
शहरात येत असल्याची गुप्त माहिती मंगळवारी तहसील कार्यालयाच्या गौण खनिज नियंत्रण पथकाला मिळाली होती. यावेळी महसूल पथकातील तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) ए.आर. चव्हाण,जी. के. गव्हाणे, व्ही आर शेलकर,महेंद्र वारकड,एस. के. देवतुळे व टी. एम. नागपुरे यांचेसह ईतर कर्मचाऱ्यांनी अवैध वाळूचा हायावा पकडून व जप्त करीत तहसील कार्यालयात उभा केला आहे.
— वाळूचा हायवा पोलिस स्टेशन आवारात लावण्यास पोलिसांचा नकार —
तालुक्यातील वडगाव तिगजी येथे दि.22 जानेवारी रोजी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या सोयगाव पोलिसांनी हायवा ट्रक एम.एच.-18 बीजी-5277 च्या चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने पकडून सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात सोयगाव तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी दि.11 फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांना चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर मालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी दिलेल्या पत्रास सपोनि पंकज बारवाल यांनी केराची टोपली दाखवीत चोरटी वाळू वाहतूक करणारा हायवा दि.12 फेब्रुवारी रोजी न्यायालयाचे आदेश घेत असल्याचे सांगून सोडून दिले होते.यामुळे सोयगाव तहसिलचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सपोनि पंकज बारवाल यांना चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर मालकाकडून दंड वसूल करण्यासंदर्भात आदेश दिले. यामुळे पोलीस व महसूल यांच्यात चांगलीच जुंपली आहे.सोयगाव महसूल विभागाने मंगळवारी रात्री पकडलेला अवैध वाळूचा हायावा ट्रक सुरक्षेचे कारणास्तव पोलिस ठाणे सोयगाव येथे घेऊन ताब्यात देण्यासाठी गौण खनिज नियंत्रण पथकातील कर्मचारी गेले असता उपस्थित ठाणे अंमलदारांनी नकार दिला.यावेळी आमच्याकडे गुन्हा दाखल नसल्याने आम्हाला वरिष्ठांच्या सूचनेनुसार हा ट्रक ताब्यात घेता येत नसल्याचे त्यांनी सांगितल्याने महसुलच्या पथकाने हा हायवा सोयगाव तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला आहे. महसुलच्या पथकाने कारवाई केलेला हायवा ट्रक हा सपोनि पंकज बारवाल यांच्या नातेवाईकाचा असल्याची चर्चा तहसिल कार्यालयात सुरू होती.