7.75 कोटींचा निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीस तडे,इमारतीच्या भवितव्यावर जनतेकडून प्रश्न उपस्थित-
प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव दि.15- सोयगाव येथे 7.75 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून रंगरंगोटी देखील करण्यात आली आहे. प्रशासकीय इमारत हस्तांतरणा अगोदरच नूतन इमारतीस तडे गेले आहे. नवीन इमारतीला हस्तांतरणा अगोदरच डागडुजी ची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आल्याने इमारतीच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव येथे नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी 7.75 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. प्रशासकीय इमारतीचे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर, उपविभाग फरदापुर अंतर्गत बांधकाम करण्यात आले. इमारतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र ठेकेदारावर आका चा असलेला राजकीय वरदहस्त व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची राजकीय दबावाला बळी पडत पत्करलेली लाचारी यामुळे कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही. इमारत बांधकाम करतेवेळी खडीचा बारीक फफुटा व मातीमिश्रित वाळूचा सर्रास वापर करण्यात आल्याने प्रशासकीय इमारतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे त्यामुळे इमारत हस्तांतरणा अगोदरच इमारतीला तडे गेले आहे. नवीन इमारतीची रंगरंगोटी केल्यानंतर इमारतीच्या डागडुजीची वेळ ठेकेदारावर आली आहे.यामुळे प्रशासकीय इमारतीच्या भवितव्यावर जनतेकडून प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.