मराठी शाळा बंद पडू देणार नाही; व्यापक जनआंदोलन उभारणार – विनोद पवार
जळगाव | प्रतिनिधी
मराठी भाषा, संस्कृती आणि संस्कार जपणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळा सध्या विविध कारणांमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थी संख्या कमी असल्याच्या कारणावरून मराठी शाळा बंद करण्याचे निर्णय घेतले जात असून, हे निर्णय मराठी समाजाच्या भविष्यासाठी घातक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विनोद पवार (जळगाव) यांनी व्यक्त केले आहे.
मराठी शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी संस्था नसून, समाज घडविण्याचे कार्य करणारी संस्कारांची केंद्रे आहेत. इंग्रजी शिक्षणाच्या नावाखाली मराठी शाळांकडे दुर्लक्ष होत असून, शासनाने शाळा बंद करण्याऐवजी त्या सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर “मराठी शाळा बंद पडू देणार नाही” ही जनचळवळ उभारण्यात येत असून, यामध्ये पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व मराठीप्रेमी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणार आहे. गावोगावी जनजागृती, पालक सभा, निवेदन, तसेच डिजिटल माध्यमातून या विषयावर व्यापक आवाज उठवण्यात येणार आहे.
मराठी शाळा टिकवणे ही केवळ शिक्षकांची जबाबदा
जबाबदारी नसून, ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला मराठी शाळेत प्रवेश देण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
मराठी शाळा वाचविण्यासाठी ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल, आणि मराठी शाळा बंद पडू दिल्या जाणार नाहीत, असा ठाम निर्धार विनोद पवार यांनी व्यक्त केला आहे.