
जळगाव महापालिकेत महायुतीचा डंका; १२ जागा बिनविरोध
अर्जमाघारीत जोरदार आघाडी, मतदानापूर्वीच राजकीय चित्र स्पष्ट
जळगाव | विशेष प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती) ने जोरदार मुसंडी मारत थेट १२ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. निवडणूक रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केल्याने शहराच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुती एकत्रितपणे मैदानात उतरली असून अर्ज माघारीच्या प्रक्रियेत विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अनेक प्रभागांत महायुतीच्या उमेदवारांचा निर्विवाद विजय निश्चित झाला आहे. प्रभाग क्रमांक १२-ब मधून भाजपच्या उज्वला बेंडाळे यांच्या विरोधातील अर्ज बाद झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
माघारीच्या दिवशी प्रभाग क्रमांक १८ मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले. तसेच प्रभाग क्रमांक ८ मधून शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी व प्रतिभा गजानन देशमुख हे दोघेही बिनविरोध विजयी झाले.
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सकाळी प्रभाग क्रमांक २ मधून शिवसेनेचे सागर श्याम सोनवणे बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्रमांक ७-अ मधून भाजपचे उमेदवार व आमदार राजुमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्यांचाही विजय निश्चित झाला. याच प्रभागातून भाजपच्या दीपाली मनोज काळे यांचीही बिनविरोध निवड ठरली.
प्रभाग क्रमांक १६ मधून भाजपचे डॉ. विरेंद्र खडके यांच्या विरोधातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची निवड निर्विवाद ठरली. तसेच प्रभाग क्रमांक १३ मधून वैशाली अमित पाटील आणि प्रभाग क्रमांक ७-ब मधून अंकिता पंकज पाटील यांचाही बिनविरोध विजय निश्चित झाला.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १९-अ मधून शिवसेनेचे विक्रम उर्फ गणेश सोनवणे यांच्या विरोधातील उमेदवाराने अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली.
अशा प्रकारे अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसअखेर शिवसेनेचे ६ आणि भाजपचे ६ असे एकूण १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून जळगाव महानगरपालिकेतील उर्वरित ६३ जागांसाठी आता प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. या घडामोडींमुळे आगामी निवडणुकीत महायुतीला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
✍️ विशेष प्रतिनिधी | विनोद पवार, जळगाव
