सोयगाव तहसील कार्यालयात लाचखोर कर्मचाऱ्यांना महत्त्वाची पदे; शासन आदेशांना केराची टोपली, तहसीलदार मेने यांच्यावर निलंबनाची मागणी
…..
सोयगाव तालुका…
प्रतिनिधी संतोष गर्दे..
…..
सोयगाव तहसील कार्यालयात गंभीर स्वरूपाचा प्रकार उघडकीस आल्याने महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाचखोरी प्रकरणात अटक होऊन निलंबित करण्यात आलेले विकास तुपारे व शरद पाटील या दोन कर्मचाऱ्यांना शासन व जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशांचे उल्लंघन करून महत्त्वाच्या व ‘मलाईदार’ विभागांचा कार्यभार देण्यात आल्याचा आरोप तहसीलदार मनीषा मेने यांच्यावर होत आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निलंबित कर्मचाऱ्यांना कोणतेही जबाबदारीचे, आर्थिक व्यवहाराशी संबंधित किंवा जनसंपर्क असलेले काम देऊ नये, असे कडक आदेश दिले होते. मात्र या आदेशांना डावलत जमा विभाग क्रमांक १ व २ सारख्या संवेदनशील विभागांची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.
या विभागांत शेतकरी, आदिवासी, शासकीय व वनजमिनींसह विविध महत्त्वाच्या प्रकरणांचा समावेश असल्याने सामान्य नागरिकांच्या तक्रारी वाढत असून त्यांची अडवणूक व गळचेपी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणामुळे सोयगाव तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
दरम्यान, शासन आदेशांची पायमल्ली केल्याप्रकरणी तहसीलदार मनीषा मेने यांना तात्काळ निलंबित करावे, अशी ठाम मागणी सोयगाव तालुका भाजपचे सरचिटणीस समाधान सूर्यवंशी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
