
३

डिसेंबर जागतिक डिव्यांग दिन विशेष …..
*दिव्यांग असतानाही खचला नाही… शेकडो देशी गाईंचा तारणहार बनलेले संदीप इंगळे!*
*छत्रपती संभाजीनगर जिल्हा : सोयगाव तालुक्यातील आमखेडा गावातील दिव्यांग तरुणाची प्रेरणादायी यशोगाथा*
दिव्यांगत्व म्हणजे जीवनाचा अंत नव्हे, तर नव्या संघर्षाची सुरुवात—हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवणारे नाव म्हणजे संदीप रामदास इंगळे. दोन्ही पायांनी दिव्यांग असतानाही जिद्द, चिकाटी, आणि समाजसेवेच्या भावनेतून त्यांनी केवळ स्वतःचे आयुष्य बदलले नाही, तर शेकडो देशी गाईंचा जीव वाचवत “मानवता” या शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ साकारला आहे.
*लहानपणीच कठोर परिस्थितीचा सामना*
सन १९८६ मध्ये मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या रामदास आणि गंगुबाई इंगळे दांपत्यांच्या घरी संदीपचा जन्म झाला. परंतु नियतीने वेगळेच लिहिले होते. अवघ्या दोन वर्षांचा असताना पोलिओने त्यांना ग्रासले आणि दोन्ही पाय व एक हात अपंग झाला. इंगळे दांपत्याने उपचारांसाठी अनेक ठिकाणी धावपळ केली. त्यातून एक हात सुधारला, परंतु दोन्ही पाय कायमस्वरूपी दिव्यांग झाले.
परिस्थितीशी लढण्याची शिकवण घरच्यांनीच दिली. मोठी बहिण सुमन हिने संदीपला उचलून शाळेत नेऊन त्याचे प्राथमिक शिक्षण सुरू ठेवले. पुढे समाजातील काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने संदीपने सोयगाव, सिल्लोड, पाचोरा परिसरात शिक्षण घेतले. दहावीनंतर आर्थिक अडचणींमुळे पुढील शिक्षण थांबले, पण जिद्द कायम राहिली.
*उदरनिर्वाहासाठी संघर्ष… आणि स्वावलंबनाचा मार्ग*
सन २००३ पासून संदीपने टेलिफोन बूथवर कामाला सुरुवात केली. त्यानंतर झेरॉक्स सेंटर, नेटकॅफे यांसारख्या छोट्या व्यवसायातून त्यांनी स्वतःला स्वावलंबी बनवले. २००६ मध्ये तहसील कार्यालयाजवळ छोटी टपरी घेऊन त्यांनी व्यवसाय उभा केला.
*दिव्यांगांसाठी लढणारा योद्धा*
२०१२ मध्ये प्रहार संघटनेशी संदीप जोडले गेले. गोरगरीब व दिव्यांग व्यक्तींच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आंदोलन, उपोषणे, निवेदने आदी मार्गांनी सतत लढा दिला. अनेकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
*पत्रकारितेतून झाले निर्भीड आवाजाचे प्रतिनिधी*
२०१७ पासून यूट्यूब चॅनल, केबल नेटवर्क आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. सोयगाव तालुक्यातील जनतेच्या समस्या मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी निर्भीड शैलीत केले. या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारही मिळाले. सध्या ते गेवराई बीड येथून प्रकाशित होणारे दै. जय महाभारत व महाराष्ट्र लाईव्ह न्यूज या न्यूज पोर्टलशी कार्यरत आहेत.
*मानवतेचा सर्वोच्च आदर्श : ११० देशी गाईंचा आधारस्तंभ*
सामाजिक कार्यातही त्यांची ओढ कमी झाली नाही. २०२१ मध्ये त्यांनी क्रांती जनहित बहुद्देश्य विकास संस्था स्थापन केली. याच संस्थेअंतर्गत अंजनाई गोशाळा, आमखेडा येथे ११० पेक्षा जास्त भाकड व कत्तलखान्यातून वाचवलेल्या देशी गाईंचे निस्वार्थपणे संगोपन ते करत आहेत. दिव्यांग असताना इतक्या मोठ्या गोशाळेचे व्यवस्थापन करणे म्हणजे खरे तर विलक्षण धैर्य आणि समर्पण!
*वैयक्तिक आयुष्यही चढ-उतारांनी भरलेले*
संदीपचा वैयक्तिक प्रवासही संघर्षांनी भरलेला. २०१० मधील विवाह काही महिन्यांतच तुटला. पण हार न मानता त्यांनी २०१३ मध्ये पुन्हा संसार सुरू केला. परिस्थितीमुळे दुसरा संसारही टिकला नाही. मात्र २०१६ मध्ये व्हॉट्सअॅपवरून एका दिव्यांग मुलीसोबत ओळख झाली आणि अवघ्या दहा दिवसांत त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. प्रहार संघटनेचे शिवाजीभाऊ गाडे यांच्या मदतीने पैठण येथे विवाह संपन्न झाला. सध्या त्यांना एक आठ वर्षांचा मुलगा असून संसार समाधानी आहे. संदीप इंगळे हे ९०% दिव्यांग असून त्यांची पत्नी सौ. उर्मिला इंगळे या देखील ६२% दिव्यांग आहे. त्यांचे वडील कै. रामदास इंगळे यांचे १४ जानेवारी २०२२ रोजी वृद्धपकाळाने निधन झाल्याने त्यांचे वडिलांचे छत्र हरवले तर आई गंगुबाई इंगळे या ८८ वर्ष वय असताना देखील खंबीर पने साथ देत आहे.
*आजही संघर्ष सुरू… पण समाजसेवा कायम.*
दिव्यांगत्व, आर्थिक अडचणी, सामाजिक आव्हाने यांचा सामना करताना संदीप इंगळे आज जे कार्य करत आहेत, ते प्रेरणादायी आहे. दिव्यांग असलेल्या शेकडो लोकांचे प्रश्न सोडवणे, देशी गाईंचे संरक्षण, सामाजिक कार्य आणि निर्भीड पत्रकारिता—ही सर्व कामे ते अविरत करत आहेत.
एक संदेश…
संदीप इंगळे यांची कथा सांगते—
*“शरीर दिव्यांग असले तरी मन आणि इच्छाशक्ती दिव्यांग नसावी. जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही!”*
संकलन :- *अरविंद कुलकर्णी सोयगाव…* लेखक व कवी….
