
अ

जिंठा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी : बेपत्ता महिलेचा अवघ्या चार तासांत शोध
*बातमी सिल्लोड*
प्रतिनिधी संतोष गर्दे
वाघेरा (ता. सिल्लोड) येथील नंदाबाई पाडुरंग घुसळे या 30 नोव्हेंबर रोजी शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. कुटुंबीयांनी केलेल्या शोधाशोधीनंतरही त्या न सापडल्याने त्यांचे पुत्र विकास पाडुरंग घुसळे (वय 24) यांनी 1 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून मिसिंग नोंद करण्यात आली.
तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी तातडीने पोलीस अंमलदार विजय पवार व पोलीस नाईक जमील तडवी यांना शोध मोहीमेच्या कामी घटनास्थळी रवाना केले. वाघेरा शिवार दाट जंगल परिसर असल्याने गावकऱ्यांमध्ये विविध शंका व्यक्त होत होत्या. काहींनी बिबट्याच्या हल्ल्याची तर काहींनी विहिरीत पडल्याची शक्यता वर्तविली.
घटनास्थळी पाहणी करून कोणताही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे पोलीस पथकाने गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. गावकऱ्यांचे संघ तयार करून त्यांना निश्चित दिशांमध्ये शोधासाठी पथकांसोबत पाठविण्यात आले. पोलीस अंमलदार स्वतः गटांसोबत जंगलात शोध घेत होते.
सुमारे 4 ते 5 किलोमीटर नाटवी शिवारात दुपारी 3.30 वाजता शोधमोहीमेचे यश मिळाले. नंदाबाई घुसळे या एका झाडाखाली व्याकुळ अवस्थेत सापडल्या. महिलेचा शोध लागताच गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. पोलीस आणि गावकऱ्यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे महिलेचे प्राण वाचले.
नंदाबाई या थकलेल्या अवस्थेत असल्याने त्यांना तातडीने गावात आणून प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढे त्यांचा जबाब नोंदवून मिसिंग गुन्हा मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या आदेशानुसार फाईल करण्यात आला.
ही यशस्वी कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय पवार आणि पोलीस नाईक जमील तडवी यांनी केली.
वाघेरा ग्रामस्थांनी चार तासांत बेपत्ता महिलेचा शोध लावल्याबद्दल पोलिसांचे मनःपूर्वक कौतुक केले असून गावात समाधानाचे वातावरण आहे.
