मुक्ताईनगरमध्ये गुटख्याची सर्रास अवैध तस्करी
शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात; कारवाईची मागणी


प्रतिनिधी संतोष गर्दे जिल्हा जळगाव
मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात गुटख्याची अवैध तस्करी सर्रासपणे सुरू असून ती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शाळकरी मुलांपासून तरुणांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. गुटख्यामुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत असताना देखील, याकडे पोलीस प्रशासन व अन्न व औषध विभाग पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक सकाळच्या व रात्रीच्या सुमारास केली जात आहे. पूर्णाड फाट्यावरून ही वाहने जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, जामनेर, छत्रपती.संभाजीनगर अशा विविध मार्गांनी पुढे रवाना होत असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे ही वाहने शहरातून बिनधास्त जात असून, यामध्ये
स्थानिक पोलिसांच्या संगनमताचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. “मांजरच दूध पित आहे” अशी खोचक टीका नागरिकांमधून होत आहे. अन्न व औषध प्रशासनही झोपेचे सोंग घेत असल्याचे चित्र आहे.
मुक्ताईनगर शहरात गुटख्याचे रॅकेट मोठ्या प्रमाणात कार्यरत असून, संपूर्ण तालुक्याला याच रॅकेटमधून गुटखा पुरवला जात आहे. त्यामध्ये शाळकरी मुलांचादेखील समावेश दिसून येत आहे. ज्यामुळे भविष्यात आरोग्य संकट ओढावण्याची भिती सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप पर्यंत ठोस कारवाई झाली नसल्यामुळे नाराजी वाढत आहे. पोलिस प्रशासन आणि अन्न व औषध विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देणार का? की पुन्हा एखादी मोठी घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
