सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी वाहिनी योजनेत सामावून घ्या : मुख्यमंत्रींकडे भाजपचे निवेदन
भाजप अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष ईदरीस मुलतानी यांची मागणी

सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे : सोयगाव तालुका हा अतिदुर्गम व डोंगरी भागातील तालुका असून येथे वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्या आहेत. विशेषतः सावळतबारा सर्कल हा बुलडाणा व जळगाव जिल्ह्याला लागून असल्याने सध्या येथील गावे बुलडाणा व जळगाव जिल्ह्यातून वीज घेतात. मात्र या जिल्ह्यांत वीज टंचाई निर्माण झाली की, सावळतबारा व जामठी परिसरातील चार गावे वीजवंचित राहतात.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भाजप अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष ईदरीस मुलतानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मुलतानी यांनी निवेदनात पुढील मागण्या मांडल्या आहेत :
१) फर्दापूर ते सावळतबारा येथे नवीन ३३ केव्ही वीज वाहिनी टाकावी.
२) रवळा येथे ३३ केव्हीचे नवीन उपकेंद्र मंजूर करावे.
३) पळसखेडा येथे ३३ केव्हीचे नवीन उपकेंद्र मंजूर करावे.
या कामांना मंजुरी मिळाल्यास सोयगाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळून शेती, शिक्षण व दैनंदिन जीवन सुलभ होईल, असा विश्वास मुलतानी यांनी व्यक्त केला आहे.
