सोयगाव:छत्रपती संभाजीनगर

प्रतिनिधी सोयगाव

सोयगाव तालुक्यातील घोरकुंड गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावकरी हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत आहे. तर दुसरीकडे गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे पाणी शेतकरी शेतीसाठी वापरत आहे. गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी

तहसीलसमोर उपोषण सुरू केले आहे. सोयगाव तालुक्यात वनगाव घोरकुंड ग्रुप ग्रामपंचायत आहे. घोरकुंड गावासाठी पाणीपुरवठा योजनेची विहीर ही गोंदेगाव शिवारातील नदीकाठी वसंत भिका पाटील यांच्या शेताजवळ असून त्यांच्या दोन्ही मुलांनी काही दिवसांपासून घोरकुंड

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून पाणी उपसा करण्यास अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. घोरकुंड गावातील पाणी टंचाई संदर्भात तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना २८ जानेवारी रोजी गावकऱ्यांनी निवेदन दिले होते. परंतु या दोन्ही अधिकारी यांनी लक्ष दिले नाही. शेवटी पाणीपुरवठा योजना विहिरीतून पाणी पुरवठा सुरळीत सुरू होण्यासाठी सरपंच संतोष पवार यांच्या सह राजेंद्र चव्हाण, समाधान जाधव, संदीप साबळे, संतोष साबळे, सुनील पाटील, सुदाम चौहान उपोषणास बसले आहेत.