शेंदुर्णी | प्रतिनिधी
मोहम्मदिया एंग्लो उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेज, शेंदुर्णी येथे Zeytin Pharma Pvt. Ltd. यांच्या वतीने PCOD (Polycystic Ovarian Disease) विषयावर एक महत्त्वपूर्ण जनजागृती शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिरात कॉलेजमधील मुलींना मासिक पाळी, हार्मोनल असंतुलन तसेच निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याविषयी सविस्तर व उपयुक्त माहिती देण्यात आली.
या शिबिराचे मार्गदर्शन प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आलिया वसीम शेख (शेख हॉस्पिटल, पहूर) यांनी केले. त्यांनी PCOD आजाराची कारणे, लक्षणे, त्याचे दीर्घकालीन परिणाम तसेच आहार, व्यायाम व जीवनशैलीत बदल करून हा आजार कसा नियंत्रणात ठेवता येतो, यावर सखोल मार्गदर्शन केले. उपस्थित मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत शंका दूर केल्या.
हा उपक्रम Zeytin Pharma Pvt. Ltd. चे PMT मॅनेजर शारमिन शेख आणि TM मॅनेजर जाविद शेख यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला. तरुण मुलींमध्ये PCOD चे वाढते प्रमाण लक्षात घेता, अशा प्रकारचे जनजागृती उपक्रम काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
शाळेच्या प्रशासनाने या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रभावीपणे पार पडला. या शिबिरात इयत्ता ८ वी ते १२ वीच्या केवळ मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला व दिलेली माहिती लक्षपूर्वक ऐकली.
हे शिबीर तरुण मुलींना त्यांच्या प्रजनन आरोग्याबाबत जागरूक करण्याच्या दिशेने एक उत्कृष्ट व प्रेरणादायी पाऊल ठरले.