िवना येथे महामार्गावर गतिरोधकांचा अभाव; चार वर्षांत १४ मृत्यू, शेकडो जखमी – शाळकरी मुलांचे जीव धोक्यात

सिल्लोड प्रतिनिधी( शेख नदीम)–अजिंठा–बुलढाणा राज्य महामार्गावरील शिवना येथील जिल्हा परिषद शाळा ते संत धोंडिबा महाराज मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने दर चार दिवसाआड अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या चार वर्षांत या ठिकाणी ४५ किरकोळ, २७ गंभीर तर तब्बल १४ जणांचा मृत्यू झाला असूनही संबंधित विभाग झोपेत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

या मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी मुले पायी व सायकलीने ये-जा करतात, मात्र वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे त्यांच्यावरही सतत अपघाताचा धोका तरंगत आहे. स्थानिक पालकांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

रस्त्यावर फोडलेले दुभाजके, दुचाकींसाठी तयार केलेली बेकायदेशीर वळणे, तसेच राँग साईटने सुसाट धावणारी वाहने ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी (दि. १३) दोन दुचाकींच्या भीषण अपघातात एक दुचाकी फुटबॉलप्रमाणे उडाली. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले होते. जखमींपैकी आशा रमेश काळे या विवाहित महिलेचा उपचारादरम्यान बुधवारी (दि. १९) मृत्यू झाला. या अपघाताचे थरारक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून नागरिक हादरले आहेत.
अलीकडेच पूर्ण झालेल्या अजिंठा–बुलढाणा राज्य महामार्ग (क्र. ७५३) वर २०२१ पासून आतापर्यंत चार किलोमीटरच्या परिसरात अपघातांची मालिका कायम आहे. महामार्गावर सतत रहदारी असूनही आणि गावकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही ठेकेदारांनी अद्याप गतीरोधक उभारले नाहीत.
परिणामी या अपघातप्रवण पट्ट्यात २७ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी होत आहेत. “आज गतिरोधक नसल्याने पुन्हा एका निरपराध व्यक्तीचा बळी गेला… आता तरी संबंधित विभागाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल नागरिक व पालकांकडून उपस्थित होत आहे.