नांदा तांडा–चारू तांडा रस्ता कामात मोठा गैरव्यवहार? कंत्राटदारावर महसूल बुडविणे, अवैध मुरूम उत्खनन व वृक्षतोडीचे आरोप
….
सोयगाव / प्रतिनिधी…
संतोष गर्दे..
……
सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा ते चारू तांडा या नवीन रस्त्याच्या कामात मोठ्या गैरप्रकारांचा गंभीर आरोप झाला आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ह्युमन ब्रिक्स मिशन, सोयगाव तालुका शाखेने तहसीलदारांना दिलेल्या तक्रार अर्जात शिवसाई कन्स्ट्रक्शन कंपनीवर शासनाचा महसूल बुडविणे, अवैध मुरूम उत्खनन आणि वृक्षतोड केल्याचा आरोप केला आहे.
तक्रारीनुसार, या रस्त्याचे काम 2025 मध्ये सुरू झाले असून कंपनीने महसूल विभागाकडून फक्त 100 ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी घेतली होती. मात्र प्रत्यक्षात 1500 ते 2000 ब्रासपर्यंत अवैध मुरूम काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच सागवान, लिंब यांसह अनेक झाडांची विनापरवाना तोड करण्यात आल्याचेही नमूद केले आहे.
स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार, गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर अजिंठा वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी 25 ऑक्टोबर 2025 रोजी पंचनामा केला. त्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी संबंधित कंपनीने 28 ऑक्टोबरला 500 ब्रास मुरूम उत्खननाची नवीन मागणी केली असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या संपूर्ण प्रकारात महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचीही संमती असण्याचा संशय तक्रारीत व्यक्त केला आहे. समितीने या प्रकरणात कंत्राटदार, अधिकारी व संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा ही देण्यात आला आहे.
या गंभीर आरोपांमुळे रस्ता कामाच्या गुणवत्तेबाबत व शासन महसूल बुडविण्याच्या मोठ्या घोटाळ्याबाबत तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे. प्रशासन कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवेदनावर तालुका अध्यक्ष विजय काळे उपाध्यक्ष सुनील चोरमले गोकुळ राजपूत आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जब्बार तडवी दिलीप देशमुख इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले
