जामनेर (प्रतिनिधी):संतोष महाले:-

जामनेर तालुक्यातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र शेंदुर्णी येथे गेल्या 281 वर्षांपासून परंपरेने साजरा केला जाणारा श्री विठ्ठल-रुक्मिणी रथोत्सव व पालखी सोहळा यंदाही भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. या पवित्र उत्सवाचे आयोजन संत काडोजी महाराज संस्थान गादीवारस व वही वाटदार आठवे श्री ह.भ.प. शांताराम महाराज यांच्या हस्ते होणार असून, सध्या शेंदुर्णी नगरीत या सोहळ्याची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे.

संस्थानाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार,

३१ ऑक्टोबर २०२५ (शुक्रवार) रोजी सायंकाळी सहा वाजता श्री ह.भ.प. शांताराम महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम निष्क्रम मंदिर परिसरात पार पडेल.

१ नोव्हेंबर (शनिवार) रोजी सकाळी नऊ, दुपारी चार आणि रात्री आठ वाजता भवन पुंडलिकांची नियुक्ती तसेच संत काडोजी महाराजांच्या अंडी सोहळ्याचे आयोजन होईल. त्याच दिवशी सकाळी साडे नऊ वाजता नगर प्रदक्षिणा कार्यक्रम पार पडेल.

२ नोव्हेंबर (रविवार) सकाळी १० ते १२ या वेळेत तुळशी विवाह सोहळा निष्क्रम मंदिरात संपन्न होईल.

३ नोव्हेंबर (सोमवार) सकाळी नऊ ते बारा या वेळेत भजन-कीर्तन मंडळे, महिला मंडळे, चौफाळ उपचार व मशालवाल्यांच्या सहभागातून भव्य पालखी सोहळा काढण्यात येणार आहे.

४ नोव्हेंबर (मंगळवार) सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत श्री विठ्ठल-रुक्मिणी रथोत्सव व पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडेल. या दिवशी विविध ग्रामस्थ भजनी मंडळी, सामाजिक संस्था आणि असंख्य भाविक सहभागी होणार असून दिवसभर अभंग, नामस्मरण आणि भक्तिगीतांचा गजर सुरू राहील.

५ नोव्हेंबर (बुधवार) रात्री २ ते सकाळी ६ या वेळेत अंडी सोहळा पार पडेल. तसेच संत काडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष कीर्तन व भक्तिसंमेलन आयोजित केले आहे.

६ नोव्हेंबर (गुरुवार) रोजी निष्क्रम मंदिर बाहेरकला सोहळा होईल.

९ नोव्हेंबर (रविवार) रोजी भवन पुंडलिकांची नियुक्ती आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी रथोत्सव सोहळ्याचा समारोप करण्यात येईल.

या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून संत काडोजी महाराजांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ह.भ.प. शांताराम महाराज यांनी केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी संस्थानतर्फे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या काळात संपूर्ण शेंदुर्णी नगरीत भक्तीभाव, नामस्मरण आणि अध्यात्मिक उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळणार असून, श्री क्षेत्र शेंदुर्णी पुन्हा एकदा ‘भक्तीचा पंढरपूर’ म्हणून उजळून निघणार आहे.