.
रस्त्यांना भेगा , भिंतींना तडे ; डोंगर कोसळतोय का ? : कपिलधारवाडीत जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी , गावकऱ्यांना दिलासा.

बीड प्रतिनिधी.
बीड , दि. २ ऑक्टोबर :
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या आणि अतिवृष्टीमुळे मौजे कपिलधारवाडी येथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे . गावातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत , जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतींना व पाया भागाला भेगा पडल्या आहेत , तसेच कपिलधारवाडी ते मन्मथस्वामी मंदिर देवस्थानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . डोंगर परिसर सरकतोय का , कोसळतोय का , अशी भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त केली जात होती .
आज बीडचे जिल्हाधिकारी मा श्री विवेक जॉन्सन साहेब, यांच्या आदेशावरून व बीडचे तहसीलदार मा श्री चंद्रकांत शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाली विभागामध्ये अतिशय उत्कृष्टपणे आपले महसूल विभागाचे कर्तव्य बजावणाऱ्या अशा , पालीच्या पाली महसूल विभागामध्ये सर्वत्र परिचित असलेल्या व बीड जिल्ह्यामध्ये महसूल विभागाचे कर्तव्य काय असते हे आपल्या महसूल विभागाच्या कर्तव्यातून दाखवून देणाऱ्या अशा आदर्श लेडी सिंघम म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या मंडळ अधिकारी शीतल ताई चाटे , तलाठी अनिल गायकवाड यांनी कपिलधारवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी केली . या वेळी ग्रामस्थ मंजुषाताई नवले , केशव शिंदे , ग्रा . पं . सदस्य मिठू शिंदे , रुद्र महाकले , संदीप नवले , अंकुश महाकले , चंद्रसेन महाकले , भिवा शिंदे तसेच महिला ग्रामस्थ सविता शिंदे , मनीषा शिंदे , लताबाई भोसले , सुमित्रा शिंदे , कासाबाई जाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली . त्यांनी सांगितले की , “ हा प्रकार नेमका कशामुळे घडून आला यासाठी तांत्रिक समितीमार्फत तात्काळ तपासणी करण्यात येईल . त्यानंतर कायमस्वरूपी पुनर्वसन अथवा इतर उपाययोजना याबद्दल कार्यवाही करण्यात येईल . ”
त्यांनी पुढे सांगितले की , “ ज्यांना नरेगा अंतर्गत मजुरीची कामे आवश्यक आहेत त्यांना तात्काळ कामे उपलब्ध करून दिली जातील . विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत जाण्याची व्यवस्था शिक्षण विभागामार्फत केली जाईल . तसेच मन्मथ स्वामी देवस्थान येथे स्थलांतरित गावकऱ्यांची पूर्णतः व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात येईल . ”
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली की , “ डोंगर सरकल्यामुळे आमच्या घरांचे , शाळेचे व मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे . प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत , अन्यथा गावाच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न उभा राहील . ”
आज दसरा असूनही प्रशासनाने तातडीने पावले उचलत भेट दिली , जिल्हाधिकारी यांनी स्वतः ग्रामस्थांना आश्वस्त केले , यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन , तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे आभार मानले .
