शेंदुर्णी – ता. जामनेर दि. 16.01.2025
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. ऑप.सोसायटी संचलित अप्पासाहेब र.भा. गरूड महाविद्यालय,शेंदुर्णी च्या राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दि.10 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत मेनगाव ता. जामनेर येथे आयोजित केले होते. या शिबिराचा नुकताच समारोप करण्यात आला. या समारोप प्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. वसंत पतंगे यांनी आपल्या मनोगतातून शिबिरा दरम्यान राबवलेले विविध कार्यक्रम व उपक्रमांचा आढावा मांडला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी तयार केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण या संदर्भातील पोस्टरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समारोप समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून प्रा.आ. केंद्र शेंदुर्णीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहितकुमार जोहरे व वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहिणी गरुड या होत्या. डॉ रोहिणी गरुड यांनी या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांनी आरोग्यप्रति जागरूक राहण्याचे आवाहन केले. विकसित भारतासाठी भारतातील तरुण हा शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा व ती सक्षमता अशा शिबिरांच्या माध्यमातून निर्माण होते असे प्रतिपादन त्यांनी केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहित कुमार जोहरे यांनी विद्यार्थ्यांनी स्वतः प्रति प्रामाणिक राहून व आपल्या करिअरच्या दृष्टीने कठोर परिश्रम घेणे गरजेचे असल्याचे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले. श्री स्नेहदीप भाऊ गरुड यांनी या रासेयो शिबिराला भेट देऊन शिबिराला शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी करिअर संदर्भात जागरूक राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.श्याम साळुंखे हे होते. त्यांनी स्वयंसेवकांना शिबिरातून शिकलेल्या व अनुभव केलेल्या गोष्टींचा जीवनात नक्कीच उपयोग होईल असे प्रतिपादन केले.
सात दिवसीय शिबिरात श्रमदानाच्या माध्यमातून गाव व परिसर स्वच्छता, झाडांना आळे करण्यात आले, रस्त्यावरील खडी वेचण्यात आली तसेच रॅली, पोस्टर व रांगोळी स्पर्धा, सजावट स्पर्धा, रक्तगट तपासणी, एच.आय.व्ही.एड्स तपासणी घेण्यात आली. स्वयंसेवकांनी गावात व्यसनमुक्ती, पाणी बचत, स्त्री – पुरुष समानता, पर्यावरण जागृती, बालविवाह, बेटी बचाओ, मोबाईलचा अतिरेकी वापर व त्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक इत्यादी सामाजिक विषयांवर आधारित प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. दररोज दुपारच्या बौद्धिक सत्रात शाश्वत ग्राम विकास, लोकशाहीत मतदारांची भूमिका, मतदान जनजागृती, बालविवाह कायदा, युवा संवाद, स्वच्छ भारत अभियान, इंडिया मधून भारत निर्माण करणे, प्लास्टिक मुक्त भारत अशा विविध विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रासेयो जळगाव जिल्हा समन्वयक डॉ.दिनेश पाटील,उपप्राचार्य प्रा.प्रमोद सोनवणे,मेनगावचे सरपंच श्री शरीफ तडवी, माजी सरपंच श्री बाळू धुमाळ, श्री विलास पाटील,श्री सुनील मेढे, श्री हरिभाऊ महाजन, शाळेचे मुख्याध्यापक श्री निवृत्ती जोहरे, श्री सुधाकर चौधरी, डॉ.प्रशांत देशमुख, डॉ. सुजाता पाटील,प्रा.संदीप कुंभार, प्रा.अजिनाथ जिवरग, प्रा.धम्मा धारगावे,श्री संधानशिव अप्पा,श्री बशरथ तडवी तसेच ग्रामस्थ व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. निरंजन बारी व कु.लोचना चौधरी या स्वयंसेवकांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. रोहिदास गवारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कु. कोमल मस्के हीने सूत्रसंचालन तर आभार गौरव याने मानले.